मराठा ३००


कालच ३०० चित्रपट पहिला. ३०० स्पार्टन योद्ध्यांनी आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी हजारो पर्शियन सैन्याचा सामना केला आणि शर्थीने लढले. जरी ते युद्ध ते जिंकू शकले नाहीत तरी त्यांनी स्वाभिमानाचे, शौर्याचे, राष्ट्राभिमानाचे उदाहरण घालून दिले. 

तो चित्रपट पाहताक्षणी सतत माझ्या नजरेसमोर येत होते ते ३०० सैन्यासह ५,००० शत्रुसैन्याशी लढणारे बाजीप्रभू देशपांडे! 

महाराज पन्हाळगडावरून मध्यरात्रीच्या सुमारास ६०० निवडक सैन्यानिशी सिद्धी जोहरचा कडक पहारा चुकवून निघाले ते पहाटेच्या सुमारास घोडखिंडीपर्यंत पोहचले. आता विशालगड केवळ ८ मैलावर होता. सिद्धी मसूद ५००० ची फौज घेऊन पाठलागावर होता आणि काहीच क्षणात ती फौज घोडखिंडीपर्यंत पोहोचणार होती. बाजीप्रभुंनी महाराजांना अर्धे सैन्य घेऊन विशालगडाकडे जायला सांगितले. 'तुम्ही विशाल गडावर पोहचल्यावर तोफेची सलामी द्या! तोवर शत्रूला खिंडीपार जाऊ देत नाही.' आणि ३०० मावळ्यांसह येणाऱ्या वादळाला सामोरे जाण्यासाठी आपल्या छातीचा पर्वत करून बाजीप्रभू खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले. 

आव्हान खूप मोठं होतं कारण पन्हाळगड ते घोडखिंड ७-८ तासाचा बिकट वाटेचा प्रवास करून मावळे आधीच थकले होते. त्यात पोटात अन्न नाही. शिवाय अपुरा शस्त्रसाठा आणि अश्या अवस्थेत किती तास लढावं लागेल याची कल्पना नाही. त्यामुळं गनिमीकाव्यानं, हुषारीनं लढणं गरजेचं होतं.

खिंडीत केलेली युद्ध रचना कशी असावी. खिंडीच्या तोंडाशी १०० मावळे बाजीप्रभूंसमवेत उभे असणार. खिंडीची वाट इतकी अरुंद कि एकावेळी ५-६ सैनिक आतून जाऊ शकतात त्यामुळे खिंडीच्या आतमध्ये थोडे थोडे अंतर राखून ५-६ सैनिकांचे गट उभे करायचे. खिंडीच्या वर काही सैनिक भले, दगड इत्यादी चा हल्ला करण्यासाठी उभे करायचे. आणि खिंडीच्या दुसऱ्या तोंडाला ५० सैनिक. 

पहिल्या १०० मावळ्यांना शत्रूच्या पहिल्या हजाराच्या फळीला सामोरे जायचे होते. म्हणजे एक मावळा १० शी लढणार. लढता लढता एखादा मावळा पडला तर बाजुच्यावर २० ची जबाबदारी येणार त्यामुळे Backup म्हणून १०० च्या पहिल्या फळीमागे २५ ची Backup फळी उभी. म्हणजे १ पडला तरी त्याची जागा घ्यायला दुसरा हजार असणार. अश्या नियोजनबद्ध पद्धतीने युद्धारचना बाजीप्रभूंनी केली होती. 

५५ वर्षांचे बाजीप्रभू दोन हातात प्रत्येकी साडे-सहा किलोच्या दोन तलवारी (दांडपट्टा) घेऊन लढायला लागले. शत्रू सैन्याची लाट मावळ्यांवर उसळत होती आणि मावले शीर हातात घेऊन आवेशाने लढत होते

पहाटे सुरु झालेलं युद्ध मध्यान झाली तरी मावळे हार मानत नव्हते. बाजीप्रभूंच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. जखम व्हायला जागा उरली नव्हती तरीही आवेशानं ते लढत होते. पण जखमा शरीराला होतात मनाला आणि मेंदूला नाहीत. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा मराठ्यांचा इतिहास आहे. 

'आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागली जडली वेडी प्रीत.' या काव्यपंक्तींची प्रचीती या प्रसंगात होती. 

सिद्धी मसूददेखील हार मानायला तयार नव्हता. त्याने बंदुकधारी आणला आणि बाजीप्रभूंना टिपायला सांगितले. बंदूकधाऱ्याने जेव्हा विचारलं या सगळ्या मावळ्यात बाजीप्रभू कसा ओळखायचा? तेव्हा सिद्धीने दिलेलं उत्तर बखरीत लिहून ठेवलं आहे. 'जो जास्त लाल झाला असेल तो बाजीप्रभू!' म्हणजे डोक्यापासून तळपायापर्यंत जखमांनी भरलेले बाजीप्रभू. त्याने बाजीप्रभूंना अचूक टीपले. गोळी सुं सुं करत बाजीप्रभूंच्या छातीत जाऊन शिरली. बाजीप्रभू कोसळले. डोळ्यासमोर अंधार यायला लागला. पण आठवलं 'राजे आजून पोहचले नाहीत, तोफांचा आवाज आला नाही.' आणि क्षणात ते पुन्हा उठले आणि लढायला सुरुवात केली. दोन्ही हातात तलवारी. एकाने वार अडवायचे आणि दुसऱ्या तलवारीने करायचे. त्यात एखादा बाण किंवा भाला शरीरात रुतला तर बाजूचा एखादा मावळा तो बाहेर काढणार आणि लढणे निरंतर चालू होते. पहाटे सुरु झालेलं युद्ध सायंकाळ पर्यंत सुमारे ८ ते १० तास चालू होतं. गोळी लागल्या नंतरही बाजी सुमारे ५ तास लढत होते. कान लागले होते तोफेच्या आवाजाकडे आणि विशालगडावरून तोफेचे आवाज आले १, २, ३, ४, ५ वेळा… 'माझे राजे पोहचले… ' बाजी प्रभूंचा कृतार्थ देह जमिनीवर कोसळला अनेक शूर मावळे मारले गेले. जे वाचले त्यांनी जंगलाचा आसरा घेऊन पळ काढला. बाजीप्रभूंच्या देहावरून सिद्धी मसूदची घोडदळ गेली. जेव्हा मावळे बाजीप्रभूंचा देह पालखीत घेण्यासाठी आले तेव्हा त्याचं अखंड शरीर सापडले नाही. त्याचे तुकडे झाले होते. जेव्हा ती पालखी विशालगडाच्या पायथ्याशी आली. काळजीने व्याकूळ झालेले महाराज लगबगीने पायथ्याशी आले. परंतु बाजीप्रभूंची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणखी एका निस्वार्थी बलिदानाचं ओझं महाराजांच्या शिरावर आले. 

बाजीप्रभूं सारख्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाचे ऒझे महाराजांवर होते. किती मोठी जबाबदारी. परंतु ती जबाबदारी महाराजांनी पार पाडली. स्वराज्य स्थापन करून ते त्याचे सार्वभौम सम्राट झाले. आणि बाजीप्रभूं सारख्या महान योध्यांचे बलिदान कृतार्थ झाले.


या प्रसंगातून आपण काय शिकतो-

जेव्हा तुमचे ध्येय मोठे असते परंतु कामगिरी त्यापुढे तोकडी पडते तेव्हा निराशा हाती येते. परंतु जेव्हा तुमची कामगिरी ध्येयाच्या पलीकडची असते तेव्हा यश निश्चित! त्यामुळे तुमच्या कामगिरीवर (Performance) लक्ष केंद्रित करा. त्यात जीव ओता. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. 

बाजी प्रभूंच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. त्या प्रसंगाची प्रेरणा आपल्याला मिळावी म्हणून हा लेख लिहावासा वाटला. असेच लेख 'मला शिवाजी व्हायचंय!' च्या माधमातून आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हे page जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा. 


ज्या मातीत मिसळलो आम्ही,
त्यातूनच जनतील कित्येक वीर पुन्हा
न गेले व्यर्थ आमुचे बलिदान
दिले त्याने जीवदान, तुमच्या विचारांना…


धन्यवाद!

सदैव आपला,
विनोद अनंत मेस्त्री

Please Visit, Like and Share our page : 
https://www.facebook.com/MalaShivajiVhaychay

जय भवानी! जय शिवाजी! जय हिंद!!!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...